चाकणमध्ये जमिनिच्या वादातून दोन कुटुंबाचा वाद विकोपाला; एकमेकांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

0
469

चाकण, दि. १९ (पीसीबी) – जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. यानंतर एकाने दुसऱ्या कुटुंबातील दोघा भावांवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वत:वरही पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मंगळवार (दि.१८) सकाळी अकराच्या सुमारास चाकण नेहरु चौकातील आमिर टॉकीजसमोर घडली.

याप्रकरणी राजेंद्र मायाराम परदेशी (वय ५५, रा. परशुराम स्मुती मंदिराजवळ, नेहरु चौक, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महेश परदेशी, कांचन परदेशी, रोशन परदेशी, ओमप्रकास परदेशी, राजेश परदेशी, रेश्मा परदेशी, प्रिती परदेशी (सर्व रा. आमिर टॉकीज समोर नेहरु चौक, चाकण) या सर्वांविरोधात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यामध्ये चाकण येथील दोन गुंठे जमिनीचा वाद आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास याच कारणावरुन आरोपींनी राजेंद्र आणि त्यांच्या भाउ विजय यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. आरोपी महेश याने स्वत:वरही पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा वनाव रचला. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक निलपत्रेवार तपास करत आहेत.