चाकणमध्ये कंटेनरचालाकाला जबर मारहाण करुन दहा लाखांचे स्पेअरपार्ट चोरट्यांनी नेले पळवून

0
447

चाकण, दि. २० (पीसीबी) – दुचाकी आडवी लावून कंटेनर चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला जबर मारहाण करत जखमी केले. त्यानंतर कंटेनरमधील दहा लाख रुपयांचे वाहनांचे स्पेअरपार्ट काढून दुसऱ्या टेम्पोत भरून चोरुन नेले. ही घटना मंगळवारी (दि. १९) पहाटे दोनच्या सुमारास नाशिक-पुणे रोडवर कुरुळी गावाजवळ स्पायसर चौकात घडली.

याप्रकरणी कंटेनर चालक सुभाष निवृत्ती कांबळे (वय ५७, रा. लोणीकंद, ता. हवेली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे (एमएच/१२/एचडी/४३४९) या क्रमांकाच्या कंटेनरवर  चालक म्हणून काम करतात.  मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते आणि त्यांचे सहकारी नीरज द्विवेदी कंटेनरमध्ये वाहनांचे स्पेअर पार्ट घेऊन जात होते. नाशिक-पुणे महामार्गावर कुरुळी गावच्या हद्दीत स्पायसर चौकात आले असता अज्ञात तीन चोरट्यांनी त्यांची दुचाकी कंटेरच्या अडवी लावून कंटेनर थांबवला. तसेच कांबळे आणि योगेश याला कंटेनरच्या बाहेर ओढून लाकडी दांडक्याने मारहाण केली. आणि कंटेनर म्हाळुंगे रोडवरील टिव्हीएस कंपनीजवळ नेऊन कंटेनर मधील तब्बल १० लाख रुपये किमतीचे वाहनांचे स्पेअर पार्ट एका टेम्पोमध्ये जबरदस्तीने भरून चोरुन नेले. चाकण पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.