चाकणमध्ये आईने पोलिसात तक्रार दिल्याने तिघांकडून मुलाला जबर मारहाण

492

चाकण, दि. १७ (पीसीबी) – महिलेने पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरुन तीन जणांनी मिळून त्या महिलेच्या मुलाला घराजवळ जाऊन काठी, कोयता आणि चाकू सारख्या वस्तूने जबर मारहाण करुन जखमी केले. तसेच त्याच्या दुचाकीचीही तोडफोड केली. या भांडणादरम्यान जखमी तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चैन देखील हरवली. ही घटना शनिवारी (दि.१६) सायंकाळी साडेचारच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीतील आडगाव येथे घडली.

प्रथमेश मारुती शिंदे (वय २१, रा. आडगाव ता. खेड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरण सबाजी सावंत, सोहेम सबाजी सावंत आणि मारुती दगडु सावंत या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी फिर्यादी प्रथमेश शिंदे याच्या आईने आरोपी किरण आणि सोहोम यांचे वडिल तर मारुती याचे नात्याने चुलते असलेले सबाजी सांवत याच्या विरोधात पोलिसा तक्रार दाखल केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरुन तिघे आरोपी हे शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास प्रथमेश याच्या घराजवळ गेले. आणि काठी, कोयता आणि चाकू सारख्या वस्तूने जबर मारहाण करुन जखमी केले. तसेच त्याच्या बुलेटची तोडफोड करुन पसार झाले. या भांडणा दरम्यान प्रथमेशच्या गळ्यातील सोन्याची चैन देखील गहाळ झाली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक भदाणे तपास करत आहेत.