चाकणमध्ये अंधाराचा फायदा घेत तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; आरोपी फरार

0
988

चाकण, दि. १२ (पीसीबी) – कामावर जाण्यासाठी कंपनीच्या बसची वाट पाहत असलेल्या एका तरुणीला अज्ञात इसमाने मागून मिठी मारुन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान घाबरलेल्या तरुणीने कशीबशी आपली सुटका करुन तेथून पळ काढला. ही धक्कादायक घटना चाकण येथील घनवट प्लाझाच्या पाठीमाघे असलेल्या मुक्तआंगननगरी समोरील चाकण-तळेगाव रस्त्यावर गुरुवार (दि.११) पहाटे पावनेपाचच्या सुमारास घडली.

याप्रकरणी पीडित २० वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गुरुवारी पहाटे पावनेपाचच्या सुमारास कामावर जाण्यासाठी मुक्तआंगननगरी समोरील चाकण-तळेगाव रस्त्यावर कंपनीच्या बसची वाट पाहत बसली होती. यावेळी अचानक मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत तरुणीला मिठी मारली. यावर घाबलेल्या तरुणीने त्या इसमाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याच्या डोळ्यात बोट घातले. यामुळे त्याने तरुणीला जोरात ढकलले. या झटापटीत तरुणी जमिनीवर पडली आणि तिच्याही डोळ्याला दुखापत झाली. तरुणीने आरडाओरड केल्याने आरोपी तेथून पळून गेला. चाकण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, अंधार असल्या कारणामुळे तरुणीला आरोपीचा चेहरा पाहता आला नाही. मात्र तिने आरोपीचे वय अंदाजे ३० ते ३५ असून अंगाने जाड असल्याचे पोलिसांना सांगितले आहे.