पुणे दहशतवादी विरोधीत पथकाकडून चाकणमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक

0
2092

चाकण, दि. ११ (पीसीबी) –  पुणे दहशतवादी विरोधी पथकाने एका संशयित दहशतवाद्याला चाकण परिसरातून देशी बनावटीचे पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसांसह अटक केली. अटक करण्यात आलेला संशयित हा स्वतंत्र खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असल्याचे समजते.

हरपालसिंग प्रतापसिंग नाईक (वय ४२, मुळ रा. रोपर, पंजाब, सध्या रा. चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुणे दहशतवादी विरोधी पथकाने अतिशय गुप्तपने हरपालसिंग याला रविवारी (दि.२ डिसेंबरला) चाकण येथून अटक केली. यावेळी त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुस ही जप्त करण्यात आले. सोमवारी (दि.३ डिसेंबरला) त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी (दि.१०) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरपालसिंग त्याच्या साथीदारांच्या मदतीने दहशतवाद्यांची टोळी बनवून देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करण्याच्या तयारीत होता. तो इंटरनेट आणि सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करुन देशातील तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यास भडकवत होता. तसेच दहशतवादी कारवायांसाठी तो सोशल मीडियाचा वापर करुन शस्त्र जमवण्याचे काम ही करत असल्याचे समोर आले आहे.

पुणे दहशतवादी विरोधी पथकाला हरपालसिंग हा पाकिस्तान आणि विदेशातील दहशतवादी विचारसरणी असलेल्यांच्या संपर्कात असल्याचा दाट संशय आहे. तसेच पंजाबच्या सरहद पोलीसांनी मोईन नावाच्या त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. लवकरच पुढील कारवाईसाठी पुणे दहशतवादी विरोधी पथक त्याला ताब्यात घेणार आहेत.