भोसरीतून तोतया पोलीसाला अटक; गुन्हे शाखेचा पीएसआय असल्याचे सांगून गोळा करत होता हप्ता

0
1723

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – पोलीस असल्याची बतावणी करुन हॉटेल व्यवसायिक, पानटपरी, किराणा दुकानदार तसेच इतर ठिकाणावरुन हप्ता गोळा करणाऱ्या एका तोतया पोलीसाला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई आज (बुधवार) भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात करण्यात आली.

राजेंद्र मोहन पाटेकर (वय ५५, रा. वैजयंती निवास, पाण्याच्या टाकीजवळ, संत तुकारामनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या तोत्या पोलीसाचे नाव आहे. त्याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अशाच प्रकारचे गुन्हे पुणे शहरात देखील दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी दिपक खरात, गणेश सावंत, प्रविण पाटील, विशाल भोईर यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, चाकण पोलीस ठाणे हद्दीत एक इसम गुन्हे शाखेचा पोलीस असल्याचे सांगून हॉटेल व्यवसायिक, पानटपरी, किराणा दुकानदार यांच्याकडून हप्ता गोळा करत आहे. यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याची शहनिशा करण्यासाठी त्या इसमाचा फोटो प्राप्त केला आणि खात्री केली. यावेळी तो इसम आज भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी राजेंद्र पाटेकर याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता तो गुन्हे शाखेचा पीएसआय असल्याचे सांगून हॉटेलात फुकट जेवण करायचा, त्यांच्याकडून पैसे घ्यायचा, छोट्या छोट्या फेरीवाल्यांकडून हप्त गोळा करायचा असे उघड झाले. तसेच कोणी पैसे देण्यास नकार केला तर त्या इसमाला पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी देखील द्यायचा, असे आरोपी राजेंद्र याने सांगितले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक करुन चाकण पोलिसांच्या हवाले केले असून त्याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस हवालदार दिपक खरात, प्रमोद लांडे, पोलीस नाईक सचिन उगले, पोलीस शिपाई गणेश सावंत, प्रविण पाटील, विशाल भोईर, गणेश मालुसरे यांच्या पथकाने केली.