चाकणमधील कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेवक केशव घोळवेंना मारहाण  

0
4534

चाकण, दि. २३ (पीसीबी) – कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट जबरदस्तीने मिळवण्यासाठी सहा जणांच्या टोळक्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह व्यावसायिक, सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. २२) दुपारी तीनच्या सुमारास चाकण येथील सिस्का एलईडी कंपनीत घडली.

या प्रकरणी नगरसेवक केशव हनुमंत घोळवे (वय ४२, रा. शिवसुंदर हाऊसिंग सोसायटी, शाहूनगर, चिंचवड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शरद ज्ञानेश्वर मांडेकर (वय २३, रा. आंबेठाण, ता. खेड), मनोज ओवले, विशाल पाटील आणि अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे म्हाळुंगे आंबेठाण रस्त्यावर सिस्का एलईडी कंपनी आहे. या कंपनीत सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घोळवे सुरक्षा रक्षकांचा आढावा घेत होते. त्यावेळी शरद आणि त्याचे पाच साथीदार कंपनीत जबरदस्तीने घुसले. कंपनीचे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट आम्हालाच मिळायला हवे, असे म्हणत त्यांनी घोळवे, सुरक्षा अधिकारी आणि सुऱक्षा रक्षकांना लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली.

तसेच आऱोपींनी घोळवे यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली. या प्रकरणी नगरसेवक घोळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकाला चाकण अटक केली आहे. चाकण पोलिस तपास करत आहेत.