Pimpri

चाकणच्या कांदा मार्केटमध्ये अपघात; पिकअपच्या धडकेत एकाचा मृत्यू

By PCB Author

January 22, 2021

चाकण, दि.२२ (पीसीबी) -चाकण मधील मार्केट यार्डात कांदा मार्केटमध्ये पिकअपने एका व्यक्तीला धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 11 जानेवारी रोजी पहाटे घडली असून याबाबत 21 जानेवारी रोजी गुन्हा दखल करण्यात आला आहे.

केशव रजाक (वय 45, रा. चाकण) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोपाळ रघुनाथ सूर्यवंशी (रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव राठोड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत केशव हे चाकण मार्केट यार्डातील कांदा मार्केटमध्ये एका टेम्पोमध्ये कांदे भरत होते. पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास आरोपी गोपाळ याने त्याच्या टेम्पोने (एम एच 12 / ई क्यू 3561) केशव यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने केशव यांचा मृत्यू झाला. आरोपी गोपाळ यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही, तो चालवत असलेल्या पिकअपचा विमा, फिटनेस यांची मुदत संपलेली आहे. असे असताना त्याने टेम्पो चालवून हा अपघात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.