‘चांद्रयान- २’ चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

0
390

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – चांद्रयान-२’ने आज (मंगळवार) सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला.  ७ सप्टेंबरला चांद्रयान-२ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे ( इस्त्रो) अध्यक्ष के. सिवन यांनी आज पत्रकार परिषदेत  दिली.

२२ जुलैला श्रीहरिकोटातील प्रक्षेपण केंद्रावरून चांद्रयान-२ चंद्राच्या दिशेने झेपावले होते. चांद्रयानाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती इस्त्रोकडून देण्यात येत होती. दरम्यान, २९ दिवसांनी आज सकाळी ९:३० वाजता चांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख के. सिवन यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहिमेच्या पुढील टप्प्याची माहिती दिली.

सिवन म्हणाले, चांद्रयान-२  सकाळी साडेनऊ वाजता चंद्राच्या कक्षेत स्थिरावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि त्यानंतर अपेक्षित कक्षेत ते दाखल झाले आहे. पुढील महत्त्वाची घटना २ सप्टेंबर रोजी घडणार आहे. लँडर कक्षेतून वेगळे होणार असून ३ सप्टेंबर रोजी लँडरची प्रणाली सर्वसामान्यपणे कार्यान्वित होण्यासाठी ३ सेकंदाचा वेळ लागणार आहे. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १.५५ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. हा क्षण बघण्यासाठी पंतप्रधान  मोदी इस्त्रोच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत, असे सिवन यांनी सांगितले.