Desh

चांद्रयान-२ उद्या अवकाशात झेपवणार

By PCB Author

July 14, 2019

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. उद्या १५ जुलै रोजी रात्री २ वाजून ५१ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ चं आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण होणार आहे. लॉन्चिंग नंतर ५२ दिवसांनी ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोहोचेल. इस्रोच्या या महत्त्वकांक्षी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे.

चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे. चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे. लाँचिंगनंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चंद्राच्या कक्षेत शिरल्यानंतर यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या आसपास ठरलेल्या जागी उतरणार आहे.

इस्त्रोमार्फत करण्यात येणाऱ्या या लॉचिंगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे,  हे लॉचिंग सर्वसामन्यांना श्रीहरीकोटा येथून प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) मागच्यावर्षी दोन वेळा अपयश आल्यानंतर ही मोहिम पार पडत आहे.

योगायोगाची गोष्ट ही की, पन्नास वर्षांपूर्वी १६ जुलै रोजी ‘अपोलो- ११’ यानाने ऐतिहासिक उड्डाण केले होते आणि बरोबर ५० वर्षांनी १५ जुलै रोजी ‘चांद्रयान- २’ या उपग्रहासह भारताचे जीएसएलव्ही मार्क- ३ (जिओसिंक्रोनस लाँच व्हेईकल) हे सर्वशक्तिमान रॉकेट श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटर येथील अवकाशतळावरून चंद्रावर स्वारी करण्यासाठी उड्डाण करणार आहे. ‘इस्रो’च्या ‘चांद्रयान- १’ या मोहिमेद्वारे २००८ साली चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा पुरावा प्रथमच जगापुढे आणून भारताने इतिहास रचला. ‘चांद्रयान- २’मध्ये लँडर, रोवर आणि ऑर्बिटर असे तीन भाग आहेत.