‘चांद्रयान-२’ची तारीख ठरली; १५ जुलैला भारताचे चंद्रावर दुसरे पाऊल

0
518

हैदराबाद, दि. १२ (पीसीबी) – भारताच्या महत्त्वाकांक्षी व बहुप्रतीक्षित ‘चांद्रयान-२’ या मोहिमेची तारीख आज भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केली. त्यानुसार, येत्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचे ‘चांद्रयान-२’ अवकाशात झेपावणार आहे. ‘चांद्रयान-२’च्या निमित्ताने अवघ्या दहा वर्षांत ‘इस्रो’ दुसऱ्यांदा चंद्रावर स्वारी करणार आहे.

‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवान यांनी या मोहिमेची माहिती दिली. याचवेळी या मोहिमेशी संबंधित माहिती देणारी एक वेबसाइटही आज लाँच करण्यात आली. ‘चांद्रयान-१’च्या धर्तीवरच ही संपूर्ण मोहीम असेल. मात्र, चंद्रावर उतरण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. प्रेक्षपणासह या संपूर्ण मोहिमेवर ९७८ कोटी रुपये खर्च होतील, असे सिवान यांनी सांगितले.

असे आहे ‘चांद्रयान-२’

‘चांद्रयान-२’चे लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. यानाचे एकूण वजन ३८०० किलो आहे. यापैकी रोव्हरचे वजन २७ किलो व लांबी १ मीटर आहे. लँडरचे वजन १४०० किलो आणि लांबी ३.५ मीटर आहे. तर, ऑर्बिटरचे वजन २४०० किलो आणि लांबी २.५ मीटर आहे.