Videsh

“चांद्रयान मोहिमेऐवजी भारताने शौचालयेच बांधावीत”; असे म्हणत विणा मलिकने उडवली चांद्रयान मोहिमेची खिल्ली

By PCB Author

September 07, 2019

इस्लामाबाद, दि. ७ (पीसीबी) –  जवळपास दीड महिन्यापूर्वी २२ जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले “चांद्रयान-२” अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, केवळ २ किलोमीटरवर काही तांत्रिक कारणामुळे विक्रम लँडरचा संपर्क तुटला. वैज्ञानिकांचा हा महत्वाकांक्षी प्रयोग थोडक्यासाठी अपयशी ठरला, त्यामुळे भारतीयांचा काहीसा हिरमोड झाला खरा, परंतु इस्रो च्या या प्रयत्नाचे संपूर्ण जगभरातून कौतुक करण्यात आले. परंतु पाकिस्तानी अभिनेत्री विणा मलिक हिने भारताच्या चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवली आहे.

विणा मलिक हिने एका मागून एक सलग तीन ट्विट करत भारतीय वैज्ञानिकांची खिल्ली उडवली आहे. यातील एक ट्विटमध्ये तर तिने चक्क “चांद्रयान मोहिमेऐवजी भारताने शौचालयेच बांधावीत”, अशी संतापजनक प्रतिक्रीया दिली आहे. अर्थात या प्रतिक्रीयेवर भारतीय नेटकऱ्यांनीही तिचा चांगलाच समाचार घेतला आहे.

दरम्यान, चांद्रयान-२ मोहिमेच्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण देश क्षणांक्षणांचं अपडेट पहात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशाने रात्रभर जागून अनुभव घेतला. मात्र, विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटपर्यंत पोहोचले असताना संपर्क तुटला. विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतर शास्त्रज्ञांबरोबरच संपूर्ण देशातील जनतेच्या काळजाचा ठोका चुकला. यावेळी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना धीर दिला. तर अरविंद केजरीवाल, गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, अक्षय कुमार, अदनान सामी यांनीही ट्विट करत वैज्ञनिकांचे मनोधैर्य वाढवले.