चांगला परतावा देण्याच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक

0
290

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवून दोघांनी एका व्यक्तीची दहा लाख 25 हजारांची फसवणूक केली. ही घटना 10 फेब्रुवारी 2020 ते 10 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी शाम साधु गायकवाड (वय 50, रा. बी यू भंडारी स्कायलाइन, दिघी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्स लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक दर्शन वर्मा आणि अमित कांतीलाल जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दर्शन वर्मा याने त्याच्या मार्स लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केलेल्या पैशावर चांगला परतावा देतो, असे फिर्यादी यांना सांगितले. त्याने कंपनीच्या अॅक्सिस बँकेच्या अकाउंटवर फिर्यादी यांच्याकडून 12 लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी गायकवाड यांना एक लाख 74 हजार 119 रुपये परत दिले. यामध्ये आरोपींनी फिर्यादी यांची 10 लाख 25 हजार 851 रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तपास करीत आहेत.