‘चलो बुलावा आया है’ फेम नरेंद्र चंचल यांचे निधन

0
208

नवी दिल्ली, दि २२ (पीसीबी) : ‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ या आणि ‘आशा’ सिनेमातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ या भजनांमुळे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नरेंद्र चंचल हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. चंचल यांना लहानपणापासून भजन गाण्याची आवड होती. मातारानीची भजन ते लहानपणापासून गात असायचे.

‘चलो बुलावा’मुळे रातोरात लोकप्रिय
चलो बुलावा आया है माताने बुलाया है… या भजनामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भजनामुळे ते घराघरात पोहोचले. तर ‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ हे गाणंही त्यांचं प्रसिद्ध झालं. आजही त्यांची गाणी लोकांच्या ओठांवर आहेत. त्यानंतर त्यांनी हिंदी, पंजाबी सिनेमात अनेक गाणी गायली.