Bhosari

चऱ्होलीत ४ वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू

By PCB Author

March 10, 2019

दिघी, दि. १० (पीसीबी) – खेळताना विहिरीत पडून एका ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.९) दुपारच्या सुमारास चार्होळी येथे घडली.

श्रेयश सागर सावळे (वय ४, रा. चऱ्होली) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास श्रेयश आणि त्याचा मित्र घराजवळील विहिरीजवळ खेळत होते. यावेळी श्रेयश हा विहिरीत डोकावून पाहत असताना त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला.  त्यानंतर त्याचा मित्र आपल्या आईकडे जाऊन श्रीयश पाण्यात खेळण्यासाठी गेला आहे. मलादेखील तिथे पाण्यात खेळण्यासाठी जायचे आहे, असा हट्ट मित्राने आपल्या आईकडे धरला. यामुळे श्रेयश कुठे पाण्यात खेळण्यासाठी गेला आहे? हे पाहण्याकरता मित्राची आई आपल्या मुलाला घेऊन विहिरीजवळ आली. त्यावेळी श्रीयश पाण्यात पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.  त्यांनी याबाबत तात्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. भोसरी अग्निशामक दलाच्या पथकाने तब्बल पाच तास श्रेयशचा शोध घेतला. रात्री पावणे अकराच्या सुमारास श्रीयशचा मृतदेह मिळून आला. दिघी पोलीस तपास करत आहेत.