Bhosari

चऱ्होलीत सासरकडच्या मंडळींनी छळ केल्याने सुनेची गळफास घेऊन आत्महत्या

By PCB Author

September 14, 2018

दिघी, दि. १४ (पीसीबी) –  सासरकडच्या मंडळींनी दागिने विकून पैसे देण्यासाठी शारीरिक आणि मानसिक झळ केल्याने सुनेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  ही घटना सोमवारी (दि. १०) सकाळी साडेनऊच्या सुमारास गंधर्वपार्क, काळजेवाडी, चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

इरफान शेख (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मयत महिलेचा पती अब्दुल उस्मान शेख (वय २५), सासरा उस्मान आझम शेख, सासू हूरा उस्मान शेख, दीर आमीन उस्मान शेख, रुकसार उस्मान शेख (सर्व रा. गंधर्वपार्क, काळजेवाडी, चऱ्होली बुद्रुक, ता. हवेली) यांच्याविरोधात  दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफाना आणि अब्दुल यांचे  २३ एप्रिल २०१८ रोजी लग्न झाले होते. लग्नामध्ये इरफाना हिच्या वडिलांनी तीला तीन तोळे सोन्याचे दागिने दिले होते. लग्नानंतर इरफाना हिच्या सासरच्या मंडळींनी पुण्यामध्ये जमिन घेतली होती. त्या जमिनीचे पैसे देण्यासाठी सासरच्या लोकांनी इरफानाचे दागिने विकण्याचे ठरविले. मात्र  त्यासाठी इरफाना हिने नकार दिला. त्यावरून सासरच्या मंडळींनी इरफाना हिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून तिने सोमवारी (दि. १०) सकाळी साडेनऊच्या सुमारास राहत्या घरातील छताला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे इरफाना हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.