चर्चेचे गु-हाळ करण्यापेक्षा भाजपने पिंपरी ते निगडी मेट्रो ‘डीपीआर’ला केंद्राची मंजुरी आणावी – विलास लांडे

0
175

पिंपरी दि. १८(पीसीबी) – पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी मेट्रो किती सक्षम आहे, याचा आढावा शरद पवार यांनी प्रत्यक्ष प्रवास करून घेतला. नागरिकांच्या काळजीपोटी वयाची 85 वर्षे गाठणारे पवार साहेब स्वतः तसदी घेतात, ही बाब पुणे आणि पिंपरी-चिंवडकरांसाठी अभिमानास्पद आहे. मात्र, पवार साहेबांच्या पाहणी दौ-याने अस्वस्थ झालेल्या चंद्रकांत पाटलांनी राजकीय सुडबुध्दीतून टिका केली आहे. टिका करताना आपली राजकीय व सामाजिक उंची तपासून तोलून मापून बोलावे.
कोल्हापुरकरांच्या नाराजीच्या पुरात वाहत येऊन पुण्यातील आयत्या मतदार संघावर स्थिरावलेल्या पाटलांनी मेट्रो प्रशासनाला उपदेशाचे डोस पाजण्याची गरज नाही, अशा शब्दांत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पाटील यांचा समाचार घेतला. चर्चेचे गु-हाळ करण्यापेक्षा भाजपने पिंपरी ते निगडी मेट्रो ‘डीपीआर’ला केंद्राची मंजुरी आणावी असे आव्हानही त्यांनी दिले.

स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली ? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. पुण्याचे एवढे आमदार, खासदार, महापौर कुणीही तिथे नाही आणि पवारच मेट्रोची ट्रायल घेण्यासाठी कसे काय जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुळात पुणे व पिंपरी-चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना जनतेची काळजी असली असती तर त्यांनी मेट्रोची पाहणी केव्हाच केली असतील. त्यांना पाहणी करण्यापासून कोणीच रोखलेले नाही. मेट्रोचे काम रखडलेले असताना त्याची दखल भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेली नाही. स्वतः आपण सुध्दा पुण्यातले आमदार असून देखील त्याचा आढावा घेऊन पाठपुरावा केला नाही. म्हणून तर आज पवार साहेबांनी स्वतः लक्ष घालून पुणे व पिंपरी-चिंचवडकरांचा सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला.

तसेच, पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी देखील सकाळी सहावाजता मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. शहरातील नागरिकांनी देखील दादांच्या कामाचे कौतुक केलेले आहे. नागपूरमध्ये बसून पुण्यातील कामाचा आढावा घेण्याची पध्दत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नाही. लोकांच्या समस्येचे मुळ शोधून त्याची सोडवणूक होईपर्यंत पाठपुरावा करणे हे पवार घराण्याचे वैशिष्ट्य आहे. यावरून पाटील यांना मिरच्या झोंबायचे कारण नाही, असेही माजी आमदार लांडे यांनी म्हटले आहे.

सत्ताधा-यांच्या नाकर्तेपणामुळे प्रस्तावित ‘डीपीआर’ मंजुरीविना पडून – लांडे

पुण्यात आठ आमदार आहे. सहा भाजपचे आमदार आहेत. खासदार बीजेपीचे आहेत. राज्यसभा सभासद प्रकाश जावडेकर बीजेपीचे आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवडला दोन भाजपचे आमदार व महापौर आहेत. असे असताना मेट्रोच्या ट्रायलसाठी फक्त पवारच का गेले ? असा ही सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. तथापि, पिंपरी ते निगडी मेट्रोच्या ‘डीपीआर’ला केंद्र सरकारने अद्यापही मंजुरी दिलेली नाही. केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आहे. हा ‘डीपीआर’ मंजूर करण्यासाठी पाटील आणि त्यांचे ढिगभर प्रतिनिधी पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठपुरावा का करत नाहीत ?. तसेच, पुणे शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहराची वेगळी ओळख आहे. पुण्यामध्ये मेट्रोचे पुणे मेट्रो असे नामकरण आहे, तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये सुध्दा पिंपरी-चिंचवड महामेट्रो असे नामकरण करण्यात यावे. यासाठी अनेकदा मागणी करून देखील फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्याची दखल घेतली गेली नाही. हा प्रकार म्हणजे पिपंरी-चिंचवडकरांच्या सन्मानावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे माजी आमदार लांडे यांनी म्हटले आहे.