चर्चा तर होणारच; मावळ आणि शिरूरसाठी वाघेरे, भोईर, लांडे खरोखरच सक्षम उमेदवार आहेत का?

3830

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागल्यापासून मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. पक्षाने घेतलेल्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मावळमधून लढण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे इच्छुक असल्याचे या बैठकीत समोर आले. वाघेरे, भोईर, लांडे या तिघांनीही राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणारच अशा अविर्भावात निवडणुकीची तयारी अद्याप तरी सुरू केलेली नाही. हे तिघेही लोकसभा निवडणुकीसाठी खरोखरच सक्षम उमेदवार आहेत का?, भाजप आणि शिवसेनेने निर्माण केलेल्या आव्हानापुढे राष्ट्रवादीचे हे संभाव्य उमेदवार टिकणार का? हा खरा प्रश्न आहे. याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात मतमतांतरे व्यक्त होत आहेत.

पिंपरी-चिंचवडचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीच्यादृष्टीने राजकीय हालचालींना वेग येऊ लागला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. या दोन्ही मतदारसंघावर शिवसेनेने सलग दोनवेळा भगवा फडकवला आहे. शिवसेनेच्या या विजयात राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे. राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत नाराजीचा शिवसेनेला कायम फायदा होत आला आहे. आता आगामी निवडणुकीतही हीच परिस्थिती कायम राहावी, यासाठी शिवसेनेने देव पाण्यात ठेवले आहेत. मावळ मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूर मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघेही पुन्हा लढण्यासाठी तयारीला लागले आहेत. या दोघांचीही नजर आपल्यासमोर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याकडे असणार आहे.

राष्ट्रवादीनेही गेल्या आठवड्यात मुंबईत बैठक घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली. त्यात मावळ लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर या दोघांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. शिरूर मतदारसंघातून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे पुन्हा लढण्यासाठी इच्छुक झाले आहेत. वाघेरे हे माजी महापौर राहिले आहेत. आपल्या पत्नीला सलग दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून त्यांनी निवडून आणले आहे. भाऊसाहेब भोईर हे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राहिले आहेत. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भोईर यांचा पराभव झाला. परंतु, अजितदादांनी भोईर यांना स्वीकृत सदस्य करून मागल्या दाराने महापालिकेच्या सभागृहात पाठविले आहे.

असे असले तरी भोईर हे सर्वपक्षीयांसोबत चांगले संबंध ठेवून असणारे दिग्गज राजकारणी म्हणून ओळखले जातात. विलास लांडे हे दोनवेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून एकदा नशिब आजमावले आहे. परंतु, शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. लांडे हे २०१४ मध्ये आमदारकीच्या निवडणुकीत पडले. लांडे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आता त्यांनी शिरूरमधून पुन्हा लढण्याची इच्छा प्रदर्शित करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वाघेरे, भोईर, लांडे हे पिंपरी-चिंचवडमधील निश्चितच दिग्गज राजकारणी मानले जातात. या तिघांनीही लोकसभा निवडणुकीची इच्छा प्रदर्शित केल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

हे तिघेही लोकसभेसाठी खरोखरच सक्षम उमेदवार ठरतात का?, भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय ताकदीपुढे या तिघांपैकी एकाला तरी फक्त आव्हान तरी निर्माण करता येईल का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे तिघेही शहराचे नेते असले तरी लोकसभेला भाजप किंवा शिवसेनेला टक्कर देऊ शकणार नाहीत, असेच उत्तर मिळते. त्यामुळे या तिघांचीही लोकसभेच्या उमेदवारीची इच्छा अधुरी राहण्याचीच शक्यता अधिक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. परिणामी मावळ आणि शिरूर मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते द्विधा मनःस्थितीत सापडल्याचे दिसून येते. अजितदादांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्याच्या चर्चेला शरद पवार यांनी नाही असे सांगून पूर्णविराम दिला आहे. दुसरीकडे अजितदादांनी बाळगलेले मौन बरेच काही सांगणारी आहे.

शिरूर मतदारसंघातही राष्ट्रवादीचा हाच उमेदवार असेल, अशी स्थिती नाही. त्यामुळे मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे त्रांगडे निर्माण झाल्याने राजकीय गुंतागुंत वाढली आहे. दोन्ही मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीचा अन्य पक्षातील सक्षम उमेदवारांवर डोळा असण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्कही लढविले जात आहेत. आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार किंवा नाही, यावरच मावळ आणि शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार हे ठरण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आगामी दोन-तीन महिन्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.