चर्चा केली, एकत्र जेवलो, अगदी गोपनीय पद्धतीने जेवलो – संजय राऊत

0
256

मुंबई,दि.२७(पीसीबी) – विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “मला ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यायची आहे. महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यविषयक संस्थांचीही इच्छा आहे, की मी संपादक म्हणून फडणवीसांची जाहीर मुलाखत करावी. त्यासंदर्भात चर्चा केली, एकत्र जेवलो, अगदी गोपनीय पद्धतीने जेवलो” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“शिवसेनेत गुप्त बैठक करण्याची पद्धत नाही. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ती काही भूमिगत बैठक नव्हती, आम्ही बंकर किंवा तळगरामध्ये भेटलो नव्हतो. त्यांची आणि माझी बऱ्याच दिवसापासून भेट झाली नव्हती” असे संजय राऊतांनी सांगितले.

दरम्यान संजय राऊत यांनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. सुरुवातीला दोन्ही पक्षांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर स्वतः संजय राऊत यांनीच या भेटीची कबुली दिली.