चक्रीवादळामुळे मोसमी पावसाला विलंब

0
380

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘वायू’ चक्रीवादळात त्याचे रूपांतर झाले असून हे वादळ गुरुवारी गुजरात सीमेवर थडकणार आहे. या चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्यास विलंब होत आहे. परिणामी दुष्काळाने होरपळत असलेल्या विदर्भ, मराठवाडय़ासह राज्याच्या इतर भागांत मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर पडणार आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह राज्याच्या काही भागांत गेले दोन दिवस पूर्वमोसमी पाऊस चांगला झाला. त्यामुळे मोसमी पाऊस विलंबाने होणार असल्याने उष्मा वाढण्याचीही भीती आहे.

‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता दोन दिवसांत वाढली आहे. ही तीव्रता पुढील चोवीस तासांत आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याच्या अंदाजात म्हटले आहे. हे वादळ आता उत्तरेकडे सरकत जाऊन पोरबंदर आणि महुआ दरम्यान गुजरातचा किनारा ओलांडून वेरावळ आणि दिव येथे धडकेल, तेथे वादळाचा वेग ताशी १३५ कि.मी राहील.

मोसमी वाऱ्यांचे भारतातील आगमन यंदा उशिराने झाले आहे. ते ८ जूनला केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागांत दाखल झाले होते. एक आठवडय़ाहून अधिक विलंबाने केरळमध्ये पोहोचलेल्या मोसमी वाऱ्यांची प्रगती चांगली असली, तरी अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राने चक्रीवादळ निर्माण झाल्याने मोसमी वारे खेचले जात आहेत. दक्षिण महाराष्ट्रात वेगाने पोहोचल्यानंतर मोसमी वारे कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापू शकतील. मात्र, कमी दाबाची प्रणाली उत्तरेकडे सरकल्यानंतर मोसमी वाऱ्यांचे प्रवाह कमी होणार असल्याने उर्वरित राज्यातील त्यांची प्रगती मंदावण्याची शक्यता आहे.