चंद्रकांत पाटील व भाजपने शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करू : रविकांत वरपे

0
310

पुणे, दि. 12 : (पीसीबी) -भारतीय जनता पक्षाच्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याविषयी एक आक्षेपार्ह ट्विट करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक हिंदू विरोधी प्रतिमा निर्माण करून पवार साहेबांचा अपमान करणारे हे आक्षेपार्ह ट्विट भारतीय जनता पक्षाने त्यांच्या ट्विटर हँडलवरून काढून टाकावे व चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागावी, अन्यथा चंद्रकांत पाटील व भाजपवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत पाटील यांनी दिला आहे.

भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करीत शरद पवार साहेब हिंदू धर्माचा द्वेष, अपमान करतात, अशी मुक्ताफळे उधळलेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे भाजप व चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेत भाजपच्या विपरीत बुद्धीची व जाती धर्मात तेढ निर्माण करण्याच्या वृत्तीची कीव येते.
रविकांत वरपे यांनी सांगितले, की शरद पवार साहेब यांनी कधीही कोणत्याही जाती धर्माचा अपमान होईल, अशी कृती केलेली नाही. हिंदू देव देवतांचा अपमान केलेला नाही. उलट हिंदू धर्मातील देवदेवतांचा आदर करीत आले आहेत. कित्येक हिंदू देवतांच्या मंदिरांचा पवार साहेबांनी जीर्णोद्धार केलेला आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. पण महाराष्ट्रात काहीही करून तेढ निर्माण करून सत्तेसाठी हपापलेले भाजपचे नेते पवार साहेबांना हिंदू विरोधी ठरवून खालच्या पातळीवरचे राजकारण करीत आहेत.

शरद पवार साहेबांनी आपल्या भाषणात ज्या कवितेचा उल्लेख केला, ती कवी जवाहर राठोड यांच्या काव्यसंग्रहातील ‘डोंगराचे ढोल’ ही कविता होती आणि त्यात पाथरवट समाजाचे जीवन, वंचित, उपेक्षित समाजाची व्यथा मांडलेली आहे. समाजाचे दुःख कविता, लेखांच्या माध्यमातून तोच समाज मांडत असेल, तर तो काय हिंदू धर्माचा किंवा देवदेवतांचा अपमान नसतो. त्या समाजाच्या न्याय हक्कासाठी पवार साहेब गेली अनेक वर्ष लढत आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. पवार साहेबांनी कधीही हिंदू धर्माचा अपमान केलेला नाही. भाजप नेते मात्र केवळ अर्धवट माहितीच्या आधारे आम्हीच फक्त हिंदूंचे कैवारी, असा आव आणत आहेत. पवार साहेबांच्या भाषणातून एक छोटीशी क्लीप काढून हिंदू समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचे काम भाजप करत आहे. कवी जवाहर राठोड यांच्या कवितेतील पाथरवट या शब्दाचा अर्थ असा आहे, की दगडाला आकार देणारा समाज. मूर्ती घडवूनही या समाजाला देवळात जाण्याचा अधिकार नाही, या व्यथा या कवितेतून मांडल्या आहेत. याचाच उल्लेख पवार साहेबांनी आपल्या भाषणात केला. मात्र, भाजपच्या चंद्रकांत पाटील यांना यातही जाती, धर्माचा तिरस्कार दिसला. यावरून भाजपच्या नेत्यांच्या बुद्धीची कीव येते.

भाजप समाजातील प्रत्येक माणसाकडे तो कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा आहे, याच दृष्टीने पाहत आलेला पक्ष आहे. पवार साहेबांवर ते नास्तिक असल्याचा सातत्याने आरोप भाजप करीत आहे. पण पवार साहेब नास्तिक आस्तिक हा विषय बाजूला ठेवून बेरोजगारी, महागाई, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था हे विषय सातत्याने दौरे करून चव्हाट्यावर आणत आहेत. हे भाजपच्या मनाला लागलेले आहे आणि म्हणूनच धर्माचा आधार घेऊन भाजप राजकारण करत आहे. खोटा इतिहास सांगणे अर्धवट अभ्यास करून चुकीचे बोलणे व समाजामध्ये दिशाभूल करणे ही भाजपची संस्कृतीच आहे.
त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या ट्विटर हँडलवरून पवार साहेबांना जाणीवपूर्वक हिंदू धर्म विरोधी ठरविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. पवार साहेबांविषयी आक्षेपार्ह मांडणी केलेले ट्विट काढून टाकून भाजपने पवार साहेबांची माफी मागितली नाही, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा इशाराही रविकांत वरपे यांनी दिला आहे.