“चंद्रकांत पाटील यांची अवस्था विनाशकाले विपरीत बुद्धी”

0
229

कोल्हापूर, दि.१४ (पीसीबी) :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जीएसटीच्या रकमेच्या मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. ‘चंद्रकांत पाटील यांची अवस्था विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी झाल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे. सध्या अजित पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

“चंद्रकांतदादांना जीएसटीची खरी आकडेवारी माहीत नाही. दुर्देवाने ते मंत्रिमंडळात नाहीत. त्यामुळे त्यांना आकडेवारीची वस्तुस्थिती माहीत नाही. केंद्राकडून महाराष्ट्राला जीएसटीचे 24 हजार कोटी येणे बाकी आहे. आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे आमच्याकडे ऑफिशियल आकडे आहेत. ते आकडे आम्हाला माहीत आहे. आम्ही पंतप्रधानांना भेटलो तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहीचं मागण्यांचं पत्रंच त्यांना दिलं आहे. त्यातही हा आकडा दिला आहे. काही लोकांना काही माहीत नसतं. काहीही बोलायची सवय असते. आपल्याकडे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी एक म्हण आहे. काही लोकांची अवस्था अशीच झाली आहे”, असा टोला पवार यांनी चंद्रकांतदादांना लगावला.

पुढे अजित पवार असंही म्हणाले कि, “म्युकरमायकोसिस आजारामुळे मृतांची आकडेवारी वाढत आहे. ही वस्तुस्थिती आहे. या आजारावरील सर्व इंजेक्शन्स केंद्राच्या अख्त्यारीत आहेत. रुग्णांच्या प्रमाणात ही इंजेक्शन मिळावीत अशी आमची मागणी आहे, असं त्यांनी सांगितलं. 15 जूननंतर ही इंजेक्शन्स मोठ्या प्रमाणावर मिळतील”, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.