चंद्रकांत पाटील आणि माझ्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न; आमदार राजेश क्षीरसागर यांचा खुलासा

0
343

कोल्हापूर, दि.२५ (पीसीबी) – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाचे वरिष्ठ नेते, गृहमंत्री अमित शहा हे दोघे महाराष्ट्रात युती व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप व सेना यांनी एक दिलाने काम केल्यानेच एनडीएला मोठे बहुमत मिळाले. भविष्यातही आमची युती अभेद्य राहणार आहेच. मात्र, काही राजकारणी यामध्ये उत्कृष्ट आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांचा व्हिडिओ आत्ता कोणीतरी व्हायरल करीत आहे. हा प्रकार करणाऱ्यांनी वेळीच थांबवावे, अन्यथा त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. तो व्हिडिओ व्हायरल करणे म्हणजे चंद्रकांत पाटील व माझ्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा खुलासा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी दोन वर्षांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संपत्तीची इ डी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. दोन वर्षांपूर्वीचा क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ सध्या कोल्हापुरात सोशल मीडियात फिरत आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शनिवारी चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांनी पोलिसांना निवेदन देऊन केली होती.

आता या व्हिडिओवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर उभे राहून तो व्हिडिओ आता प्रसारित करणे खोडसाळपणा असल्याचा खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.