चंद्रकांत पाटलांच्या बॉडीगार्ड आणि पोलिसांकडून कोल्हापूरच्या महापौरांना धक्काबुक्की

590

कोल्हापूर, दि. २३ (पीसीबी) – राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बॉडीगार्ड आणि पोलिसांनी कोल्हापूरच्या महापौर शोभा बेंद्रे यांना धक्काबुक्की केल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरातील मानाच्या तुकाराम माळी गणपतीचे पूजन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाल्यानंतर मंत्री पाटील यांच्या बॉडीगार्ड आणि पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप महापौर शोभा बेंद्रे यांनी केला आहे.

या प्रकारानंतर महापौर शोभा बेंद्रे यांनी घटनेचा निषेध केला आहे. तसेच यापुढे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे की नाही ते ठरवावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. महापौर बेंद्रे यांच्या पाठोपाठ विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही धक्काबुक्की केली.