चंद्रकांत पाटलांकडे पालिका विकासकामांच्या उद्घाटनासाठी कोणते संवैधानिक पद ‌आहे ?

0
471

– राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ पाटील यांचा भाजपला सवाल

– शरद पवार यांच्या मेट्रो दौऱ्यावरून टिका करणाऱ्या भाजपवर सडकून टीका

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि देशातील राजकारणातील ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी केलेला पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचा पाहणी दौरा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेत्यांना चांगलाच झोंबला आहे. मेट्रोच्या श्रेयासाठी चाललेली भाजपची धडपड स्पष्ट दिसत आहे. परंतु आदरणीय शरद पवार साहेब यांच्यावर आरोप करताना भाजपच्या नेत्यांनी आपली राजकीय उंची तपासावी. ते राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी मेट्रोसारख्या केंद्र व राज्याच्या निधीतून प्रकल्पाची पाहणी करण्यात गैर काय ? तर ज्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकासप्रकल्पाचे भूमिपूजन, उद्घाटन करण्यासाठी कोथरु़डचे जावई आमदार चंद्रकांत पा़टील येतात. तेव्हा त्यांच्याकडे कोणते संवैधानिक पद आहे, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ पाटील यांनी भाजपवर सडकून टिका केली आहे.

आदरणीय शरद पवार यांनी सोमवारी (दि. 17 जानेवारी 2022) पुणे महामेट्रोला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी फुगेवाडी ते पिंपरीपर्यंत मेट्रोतून प्रवास केला. परंतु, शरद पवार साहेब यांनी मेट्रोला दिलेल्या भेटीवरून सत्ताधारी भाजपने राजकारण सुरू केले आहे. त्यावर संजोग वाघेरे‌ पाटील यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. ते म्हणाले की, पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो प्रकल्पाची मुहूर्तमेढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात रोवली गेली. या प्रकल्पात केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेचा आर्थिक हिस्सा आहे. करदात्यांच्या खर्चातून हा मेट्रो प्रकल्प साकारत आहे. मेट्रो किंवा ठराविक कोणता प्रकल्प म्हणजे भाजपची मक्तेदारी नाही. आदरणीय शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही प्रकल्पाला भेट दिली तर बिघडलं कुठं ?

महामेट्रोच्या व्यवस्थापनाने शरद पवार यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा विचार करून या दौ-याचे नियोजन केले. त्यांच्या सूचना स्विकारल्या. पण, भाजपच्या मंडळींना मिरच्या का झोंबल्या आहेत ? भाजपने देशात सगळीकडे कुरघोडीचे राजकारण केले आहे. इथेही श्रेयासाठी चाललेली भाजपची धडपड दिसते. जे चंद्रकांत पाटील पवार साहेबांवर टीका करत आहेत. ते कोल्हापूरवरून कोथरुडला जावई म्हणून आलेले आहेत. शरद पवार यांची राजकीय कीरकीर्द पाहूनच पाटलांनी आपली उंची तपासावी. या प्रकल्पात भाजपच्या आमदार, पदाधिका-यांना का सहभागी करून घेतले नाही, याचे दुःख भाजपला झालेले दिसते. त्यांना आतापर्यंत मेट्रोच्या पाहणीसाठी कोणी अडवले होते ? उलट ज्या शहराने आणि मतदारांनी सत्ता दिली. त्यांच्यासाठी भाजपच्या नेत्यांना शहरात येण्यासाठी वेळ नाही. आपले अपयश झाकण्यासाठी इतरांवर टीका करण्याचा हा उद्योग भाजपने थांबवावा.

राजशिष्टाचार आणि संवैधानिक पदाचा अवमान झाल्याचे सांगून शहराच्या महापौरांनी महामेट्रोचा निषेध केला. महापौरासारख्या महत्त्वाच्या पदाधिका-यांनी शिष्टाचार समजून घ्यावा. तर महापौर होण्यापूर्वी आपण कोणत्या पक्षाकडून आणि कोणाच्या आशिर्वादाने उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष झाला होतात ? हे शहराला सांगावे आणि आपण कोणावर टिका करतो आहोत ? याचे थोडे भान शहराच्या महापौर म्हणून ठेवावे. कोणाच्या तरी सांगण्यावरून महापौरपदाची गरिमा घालवू नये, असा उपरोधिक सल्ला संजोग वाघेरे पाटील यांनी पिंपरी चिंचवडच्या महापौरांनाही दिला आहे.