घोटाळे केले नसते तर पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती- उद्धव ठाकरे

0
418

माण, दि. १९ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माणमध्ये घेतलेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे नेते भर पावसात सभा घेत आहेत. पण गावांमध्ये ठणठणाट आहे. तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर तुम्हाला आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असा टोला त्यांनी शरद पवार यांना लगावला.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच, सर्वच पक्षाचे राजकीय नेते प्रचारसभा, रोड शो करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नगर जिल्ह्यात प्रचार सभा होत असतानाच, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माणमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भर पावसात सभा घेत आहेत, पण गावांमध्ये ठणठणाट आहे, असा टोला लगावतानाच तुम्ही तेव्हा ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर आज पावसात सभा घेण्याची वेळ आली नसती, असा घणाघात त्यांनी केला. जेव्हा करायचे होते, तेव्हा काही केले नाही आणि आता आपले सरकार मजबूत होऊन पुढे पाऊल टाकत असताना, त्याला अपशकुन करायचा, अशी टीकाही त्यांनी केली.