“घोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीम यांना तुरूंगात धाडणार. आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात”

0
400

कोल्हापूर, दि.२८ (पीसीबी) : घोटाळेबाज मंत्री हसन मुश्रीम यांना तुरूंगात धाडणार. आजपासून ठाकरे सरकारच्या अंताची सुरुवात झाली आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याचवेळी किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा तिसरा आरोप करण्याची शक्यता आहे.किरीट सोमय्यांनी यापूर्वीही कोल्हापूर दौरा घोषित केला होता, त्यावेळी त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. पण आता सोमय्यांवरील ही जिल्हाबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापुरात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. किरीट सोमय्या हे सकाळी 8 च्या सुमारास कराडहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. त्याआधी कराडमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचे शेतकरी, संचालकांनी सोमय्यांची भेट घेतली.

किरीट सोमय्या सकाळी 10.30 सुमारास कोल्हापुरातील अयोध्या हॉटेलवर पोहोचतील. तिथे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पुढे 11 वाजता महालक्ष्मी मंदिराकडे रवाना होतील. महालक्ष्मीच्या दर्शनानंतर ते थेट 11.30 च्या सुमारास तक्रार देण्यासाठी मुरगूड पोलीस ठाण्यात दाखल होतील. यानंतर 4 वा. ते प्रसार माध्यमांशी बोलणार आहेत. यावेळी किरीट सोमय्या आज हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्या घोटाळ्याचा आरोप करण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कोल्हापूरला येण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्यावरील जिल्हा बंदी उठवली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसे आदेश जारी केले. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी उठवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

तर सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना चिथावणीखोर वक्तव्य करु नयेत. त्यांनी आमचं सामाजिक काम पाहावं, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. त्याचबरोबर आपले समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्यासंही मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आतापर्यंत दोन आरोप केले आहेत. यामध्ये पहिला आरोप म्हणजे कागलमधील सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याबाबतचा आहे. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला. बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत, असा पहिला आरोप सोमय्यांनी केला होता.

सोमय्यांनी दुसरा आरोपही साखर कारखान्याबाबत केला आहे. आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यातही बेनामी कंपन्यांद्वारे पैशांची अफरातफर केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यामध्ये किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासोबत त्यांच्या जावयाकडे बोट दाखवलं आहे.