घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांसह पाच दहशतवादी ठार

0
344

मुंबई, दि. १० (पीसीबी) –  पाकिस्तान भारतात अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी सोमवारी दिला आहे. मात्र, हा इशारा देण्यापूर्वीच भारतीय लष्कराने गेल्या आठवड्यात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या घुसखोरीचा डाव उधळून लावला. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सीमा सशस्त्र दलाच्या (बॉर्डर अॅक्शन टीम) जवानांसह पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या कारवाईचा व्हिडीओ लष्कराने सोमवारी जारी केला आहे.

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ए रद्द केल्यानंतर पाकिस्तानने थयथयाट करायला सुरूवात केली. काश्मीर मुद्यावरून आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रतिसाद न मिळाल्याने पाकिस्तानकडून सीमेवर तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, ऑगस्ट पहिल्या आठवड्यात पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या (बॅट) जवानांसह अतिरेक्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. केरन सेक्टरमधील घुसखोरी डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. लष्कराने केलेल्या कारवाईत बॅटच्या सैनिकांसह पाच दहशतवादी ठार झाले आहेत. या कारवाईची लष्कराने सोमवारी माहिती दिली. तसेच याचा व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओ पाच जणांचे मृतदेह दिसत आहे.

दरम्यान, पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची गुपचूप सुटका केल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिली आहे. पाकिस्तान भारतामध्ये घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत आहे. त्याच अनुषंगाने ही सुटका करण्यात आल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. याला लष्करानेही दुजोरा दिला आहे. “दक्षिण भारत आणि द्वीपकल्पांवर दहशतवादी हल्ला करणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. सर क्रीक भागातून एक संशयित बोटही मिळाली आहे”, असे लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.