घाबरू नका, मानसिकदृष्ट्या खंबीर व्हा – आमदार महेश लांडगे यांचे जनतेला आवाहन

0
301

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – कोरोना मुळे समाजात अस्वस्थता वाढली आहे. लोक भावनीक झाले आहेत. एक प्रकारची घबराट आहे. मात्र, या परिस्थितीला घाबरू नका, ज्याला कोरोना झाला आहे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला मानसिक आधार द्या, स्वतः खंबीर व्हा असे आवाहन भोसरी मतदारंसघातील भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केले.

शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमिवर आमदार महेश लांडगे यांनी फेसबूक लाईव्ह द्वारे नागिकांशी संवाद साधला. आमदार लांडगे म्हणाले, कोरोना बद्दल एकूण मन अस्वस्थ होते, भावनीक होते. आपल्याला नातेवाईक, मित्रांबद्दल आपल्याला आपुलकी असते, प्रेम असते. आज कोरोना झाला समजले की लोक आपल्याच मानसापासून दूर जातो आहे याचे वाईट वाटते. अद्याप कोरोनाच्या आजारावर कोणतेही औषध नाही. त्यासाठी कोणालाही कोरोना झाला तर त्याला मानसिक आधार देण्याची गरज आहे. जे काम डॉक्टर किंवा मित्र परिवार करत असतात ते आता सर्वांनी केले पाहिजे.

या पध्दतीने कोरोना झालेल्या नागरिकांना आधार देण्याची नितांत गरज आहे. कोरोना झाल्यावर प्रशासन त्या रुग्णाचे घर सील करते. लोक संपर्क तोडतात, बोलणे बंद करतात, कोणीही नातेवाईक त्याच्याकडे जात नाहीत. एकप्रकारे त्या कुटुंबाला वाईट अनुभव येतो आणि ते खचते. खरे तर, अशा वेळी अशा कुटुंबाला मानसिक ताकद देण्याची गरज आहे. एक फोन करून आधार दिला पाहिजे, असे कळकळीचे आवाहन आमदार लांडगे यांनी केले.

आपल्या कुटुंबाचा अनुभव सांगताने ते म्हणाले, मी कोरोना रुग्ण म्हणून गेलो होतो. माझे कुटुंबातील पत्नी, भाऊ, भावजय, मुले असे सर्वच कोरोना मध्ये अडकलो होतो. त्यावेळी लाखो लोकांनी शुभेच्छा दिल्या. माझ्या परिवाराला मोठा आधार दिला. हा सपोर्ट महत्वाचा खूप आसतो. त्यातून कुटुंबाचे मनोधैर्य वाढते. कोरोना झाला की प्रशासन त्यांचे काम करते. घराला बोर्ड लावते. खबरदारीचे उपाय सांगते. मला असे वाटते की, ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळेल त्या परिवाराला सोशल मीडियातून म्हणा अथवा मोबाईलवर आपण आधारा दिला पाहिजे. डॉक्टर त्यांच्या परिणे सर्व प्रयत्न करतात, पण खरा आधार त्याला शुभेच्छांचा मिळतो. मला सांगायला बरे वाटते, मला माझ्या परिवाराला कोरोना झाला होता, पण केवळ जनतेच्या सदिच्छांमुळे त्यातून आम्ही लवकर सुखरूप बाहेर आलो.

शहरातील रुग्ण कमी व्हावेत यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. दहा दिवसांचा लॉकडाऊन हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करा. पाच दिवसांचा पहिला टप्पा आहे. जनता कर्फ्यु प्रमाणे सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची गरज आहे. आरोग्य वैद्यकीय विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे यांचे कौतुक केले पाहिजे. गेले तीन महिने ते अखंडपणे राबत आहेत. त्यांना आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. लॉकडाऊन काटेकोरपणे पाळला पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरात राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे लोक राहतात. त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुखरूप ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आमदार लांडगे म्हणाले.

शहर सुरक्षित रहावे, यासाठीच लॉकडाऊन आहे, असे सांगुन आमदार लांडगे यांनी दहा दिवसांच्या लॉकडाऊनचे जोरदार समर्थन केले. शहरातील सर्व नागरिक या कोरोनाच्या संकटातून सुखरूप बाहेर पडतील अशी ग्वाही आमदार लांडगे यांनी दिला. कोरोना पासून बचाव करायचा तर घरा बाहेर विनाकारण फिरू नका, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखा, सतत मास्क घाला. लॉकडाऊन पहिले पाच दिवसांसाठी कठोरपणे पाळायचा आहे. त्यातून कोरोनाची साखळी तोडण्यात आपण यशस्वी होऊ. परमेश्वर आपणा सर्वांनी ताकद देवो. लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला मदत करा, असे आवाहन त्यांनी पुन्हा पुन्हा केले.