घाईत उरकला दुष्काळी दौरा; संभाजी पाटील निलंगेकरांनी अंधारात केली पिकांची पाहणी

0
483

बीड, दि. २८ (पीसीबी) – मराठवाड्यासह राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांचे दुष्काळ दौरे सुरू झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुरू झालेले हे दौरे केवळ फार्स ठरल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मोबाईल आणि टॉर्चने अंधारात पिकांची पाहणी केली. त्यांनी बीडच्या दुष्काळी दौऱ्यात अंधारातच पिकांची पाहणी केली.

नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिरा येऊन त्यांनी रात्रीच्या अंधारात मोबाईल आणि टॉर्चच्या उजेडात नित्रुड येथील शेतातील कापसाच्या पिकाची पाहणी केली. आज चंद्रपूर मध्ये होणाऱ्या नियोजित कार्यक्रमासाठी संभाजी पाटलांना जायचे असल्याने ते पुढे निघून गेले.

मंत्री निलंगेकर दुपारी तीन वाजता नित्रुड येथील शेतात पाहणी करण्यासाठी येणार होते. नियोजित वेळेपेक्षा ते तब्बल चार तास उशिरा आल्याने अंधार पडला होता. गाडीच्या खाली उतरताच त्यांचा ताफा रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील कापसाच्या पिकाची पाहणी करण्यासाठी गेला. परंतु अंधारामुळे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे टॉर्चच्या उजेडातच त्यांनी कापसाच्या पिकाची पाहणी करून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.