घरी जायला खिशात पैसे नव्हते म्हणून चक्क परिवहन मंडळाची बस घेऊन पसार

0
507

तेलंगण, दि.१८ (पीसीबी) – स्वत:च्या घरी जायला खिशात पैसे नव्हते म्हणून चक्क परिवहन मंडळाची बस घेऊन पसार झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी  तेलंगणच्या विकाराबाद जिल्ह्यात घडल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तेलंगण राज्य रस्ते परिवहन निगमची (TSRTC) एक बस तंदूर बस स्थानकावर थांबली होती. त्याचवेळी एक व्यक्ती तिथून स्वतःच्या घरी जाण्यासाठी एखादी गाडी येतेय का याची वाट पाहत होता. पण, बराच वेळ वाट बघितल्यानंतर एकही गाडी न भेटल्याने तो माणूस चक्क समोर उभी असलेली एसटी घेवून फरार झाला. एसटी पळवणारी ती व्यक्ती त्याच बस स्थानकावर काम करत असावी, असे सांगितले जात आहे. रविवारी रात्री घरी जाण्यासाठी त्याला काहीच साधन न मिळाल्याने त्याने एसटी पळवण्याचे पाऊल उचलले. स्वतःच्या घरी पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीने पळवून आणलेली बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि फरार झाला. आता, याप्रकरणी बस चोरी करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात येत असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.