Chinchwad

‘घराबाहेर आल्यास जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत परिसरात दहशत

By PCB Author

July 13, 2021

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – जमावाने तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच तलवार आणि लाकडी दांडक्याने एका दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर ‘घराबाहेर आल्यास जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देत आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री रामनगर चिंचवड येथे घडली.

राहुल युवराज शेलार (वय 29, रा. दत्तनगर, शेलार गल्ली चिंचवड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पवन विष्णू लष्करे (वय 24, रा. रामनगर, चिंचवड), आकाश कुसाळकर (वय 29, रा. दत्तनगर चिंचवड), बालाजी युवराज कोकाटे (वय 30, रा. दत्तनगर चिंचवड), अण्णा कुसाळकर (वय 30, रा. रामनगर चिंचवड) आणि त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आकाश कुसाळकर आणि बालाजी कोकाटे या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी राहुल शेलार हे रामनगर, चिंचवड येथील सार्वजनिक शौचालय जवळ लघुशंका करीत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. लाकडी दांडक्याने राहुल यांच्या पाठीत, कानावर, हातावर, पायावर मारून त्यांना जखमी केले. त्यावेळी फिर्यादी यांचे नातेवाईक भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीला शिवीगाळ केली. आरोपींनी तलवार आणि लाकडी दांडक्याने फिर्यादी यांचे नातेवाईक योगेश भोसले यांच्या दुचाकीची (एम एच 14 / एच एच 5577) तोडफोड केली. त्यानंतर आरडाओरडा करत जमलेल्या लोकांना धमकावले. ‘घराबाहेर आल्यास जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.