घरगुती गॅस चोरीप्रकरणी नऊ जणांना अटक

0
229

सांगवी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने दापोडी येथे छापा मारून कारवाई केली. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करून ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच तीन गॅस एजन्सी चालक व जागामालक यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल केला. ही कारवाई रविवारी (दि. 26) सकाळी पावणे दहाच्या सुमारास बॉम्बे कॉलनी, दापोडी येथे करण्यात आली.

गॅस रिफिल करणारा नागेंद्रपाल योगेन्‍द्रपाल सिंह (वय 28), छोटू श्रीभगवान बघेल (वय 19), कामगार करतार छोटेलाल सिंह (वय 26), राजेंद्रसिंग जोरसिंग सिंह (वय 40), टेम्पो चालक हरिकांत रौतान सिंह तोमर (वय 33), हरिशंकर धनीराम सिंह (वय 22), आकाश शेर सिंह (वय 19, रा. बॉम्बे कॉलनी दापोडी), देविदास तुळशीराम बिरादार (वय 53, रा. शितोळे नगर, सांगवी), विष्णू बब्रुवान पवार (वय 23, रा. जुनी सांगवी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्यासह बंटू सिंह (वय 30, पूर्ण नाव माहीत नाही), जागा मालक वसंत खेमाजी काटे (वय 65, दोघेही रा. बॉम्बे कॉलनी दापोडी), तसेच कांकरिया एचपी गॅस एजन्सी, वंदना भारत गॅस एजन्सी, देगलूरकर भारत गॅस एजन्सीचे चालक व मालक यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस नाईक मारुती करचुंडे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून कमर्शिअल गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरून गॅसची चोरी होत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी कारवाई केली. आरोपींनी गॅस एजन्सीकडून अतिप्रमाणात गॅस साठा घेतला. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून धोकादायकरित्या कमर्शिअल सिलेंडरमध्ये गॅस भरला. गॅसची चोरी करून ग्राहकांची फसवणूक केली.

आरोपी वसंत काटे याने गॅस चोरी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच कांकरिया एचपी गॅस एजन्सी, वंदना भारत गॅस एजन्सी, देगलूरकर भारत गॅस एजन्सीचे चालक व मालक यांनी रिकामे गॅस सिलेंडर गोडाउनमध्ये जमा करून न घेता तसेच भरलेले गॅस सिलेंडर ग्राहकांना वितरित केले जातात किंवा नाही याची खातरजमा केली नाही.

पोलिसांनी या कारवाईत आठ हजार 240 रुपये रोख, तीन लाख 44 हजार 754 रुपये किमतीचे गॅस सिलेंडर व साहित्य, तीन लाख 25 हजार रुपये किमतीचे सहा टेम्पो, वीस हजार रुपये किमतीची एक दुचाकी, असा सहा लाख 97 हजार 994 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.