Pune

घनपाठ अतिशय खडतर तपश्चर्या; वेदाभ्यासाच्या जतन आणि संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – – आ. चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

By PCB Author

October 05, 2021

पुणे, दि. ५ (पीसीबी) – आपल्या भारतीय संस्कृतीत वेदांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यासाठी घनपाठ ही अतिशय खडतर तपश्चर्या आहे. वेदाभ्यासाच्या जतन आणि संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. सद्गुरु ग्रुप आणि अरविंद ग्रुप सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि शारदा ज्ञानपीठम् संस्थेचे संस्थापक वेदमूर्ती पंडित श्री. वसंतराव गाडगीळ यांच्या गरुवर्यपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, सद्गुरु ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, अरविंद सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत अरविंद जगताप, घनपाठी दत्तात्रय नवाथे, प्रकाश दंडगे, सद्गुरु ग्रुप संस्थेचे सचिव धनंजय घाटे, जगदीश जोशी, वासुदेव जोशी, आदींसह घनपाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात 21 वेदसेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

श्री. पाटील म्हणाले की, “आपल्या भारतीय संस्कृतीत वेद, उपनिषदे यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. वेदाभ्यासाठी घनपाठ ही अतिशय खडतर तपश्चर्या आहे. त्यामुळे वेदाभ्यासाचे जतन, त्याचा प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी कोणत्याही प्रकराची आवश्यकता भासल्यास, त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर म्हणाले की, “आपल्या भारतीय संस्कृतीचा वेद हा एक ठेवा आहे. हा ठेवा जतन व्हावा, यासाठी पुणे विद्यापीठाचे देखील विशेष प्रयत्न सुरु असून, यासाठी पुणे विद्यापीठातील संस्कृत विभाग आणि सद्गुरु ग्रुप यांच्यामध्ये एक करार करण्यात येणार असून, यामुळे वेदांच्या जतन, संवर्धन आणि प्रचार-प्रसारासाठी विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदगुरु ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुलकर्णी केले. स्वागत भारत जगताप यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रसाद व्यास आणि अमित पंचादवे यांनी केले. आभार प्रदर्शन शंकर आपटे यांनी केले.