ग्रामपंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली; आता प्रचाराचं धुमशान!

0
413

पुणे, दि. ४ (पीसीबी): गेल्या आठ दिवसांपासून उमेदवारी मिळण्यासाठी सुरू असलेली सेटिंग… त्यानंतर अर्ज भरण्यासाठी सुरू झालेली धडपड…. नंतर अर्ज मागे घेण्यासाठीची मनधरणी… अमिषांचं गाजर… अशा सर्व गोंधळात अखेर आज अर्ज मागे घेण्याची वेळही संपली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीचा राज्यभर धुरळा उडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सख्खे मित्रं, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात लढतानाचे चित्रंही दिसणार आहे. काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी थेट चौरंगी लढत पाहायला मिळणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून (23 डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. राज्यातील 34 जिल्ह्यांमधील तब्बल 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. आज या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक पक्षांनी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली. त्यात काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी यश आलं नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागात निवडणुका अटळ झाल्या आहेत.
गडचिरोलीत 361 ग्राम पंचायतमधील नामांकन अर्जाची छाननी
गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे नामांकन अर्जाच्या छाननीचे काम सुरू आहे. तहसिल कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयात हे काम सुरूच असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने या ठिकाणी उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे.
जिल्ह्यातील नवरगाव ग्रामपंचायत अनेक वर्षापासून काँग्रेसच्या ताब्यात होती. पण काँग्रेस नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने या ठिकाणचे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
बारामतीत यात्रेचे स्वरुप
बारामती तालुक्यातल्या ५२ ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी निवडणुक होतेय. त्यासाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी बारामतीतील प्रशासकीय भवनाला यात्रेचं स्वरुप आलं होतं. गाव पातळीवरील राजकारणात आपलं वर्चस्व राहावं यासाठीच सर्व नेते प्रयत्नशील होते. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी तहसिल कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. विशेष म्हणजे पाऊस सुरू असतानाही या समर्थकांनी तहसिल कार्यालयाबाहेर तळ ठोकला होता.
धुळ्यात तुफान गर्दी
धुळे जिल्ह्यातील एकूण 218 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची लगबग पाहायला मिळाली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी धुळे तहसिल कार्यालयाबाहेर उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांनी एकच गर्दी केली होती. धुळे, शिंदखेडा व शिरपूर तहसील कार्यालयाबाहेर ही तोबा गर्दी जमली होती. उमेदवारांनी अर्ज मागे घेताच किंवा एखादा उमेदवार बिनविरोध निवडून येताच एकच जल्लोष केला जात होता.

विखे पाटलांचं यश
शिर्डीतील सावळीविहिर खुर्द ग्रामपंचायतीत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यश आले. दोन्ही विखे गटात अडीच अडीच वर्ष सरपंचपद देण्याचा फॉर्म्युला ठरला आणि 11 सदस्य बिनविरोध निवडून आले. विखे पाटलांना त्यांच्या मतदारसंघातील 25 पैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात यश आलं. त्यात लोणी बुद्रुक, सावळीविहिर खुर्द आणि पिंप्रीलोकई ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर भगवतीपूर येथे एकच उमेदवार दोन जागेवर उभा आहे. कोल्हार बुद्रुक येथे 2 अपक्षांनी माघार घेतल्याने निवडणूक होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पाच ग्रामपंचायतीत विखे समर्थकांची सत्ता आली आहे.
वसमत तालुक्यातील कुरुंदा ग्रामपंचायत बिनविरोध
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील 17 सदस्य संख्या असलेली कुरुंदा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. इतिहासात पहिल्यांदाच कुरुंदा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. कुरुंदामधूनच वसमतचे राजकारण चालत असल्याने या निवडणुकीला मोठं महत्त्व आलं होतं. तर वसमत बाजार समितीचे सभापती राजेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कल्याणमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कल्याण तालुक्यात 21 ग्रामपंचायती आहेत. कल्याण तहसील कार्यालयाकडून ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे. कल्याण तहसील कार्यालयाने खडकपाडा येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात निवडणूकीच्या प्रक्रियेसाठी जागा घेतली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. मात्र मुंबई उपकेंद्रात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची एकच गर्दी दिसून आली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हता. कल्याण डोंबिवली हा कोरोनाचा हॉटस्पॉट होता, असं असतानाही अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोसल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

कल्याण तालुक्यात 21 ग्रामपंचायती आहेत. या 21 ग्रामपंचायतीमध्ये 211 जागांसाठी निवडणूक होत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस होता. 21 पैकी एक वरप ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. वरप ग्रामपंचायत 13 सदस्यांच्या जागा आहे. ग्रामस्थांनी आणि सर्व पक्षीय ग्रामस्थांनी मिळून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. 13 सदस्य गाव विकास आघाडीचे पॅनल बिनविरोध निवडून आले आहे. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष भाऊ गोंधळी यांच्या पुढाकाराने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
चंद्रपुरातील भिसी ग्रामपंचायतीत 65 उमेदवारी अर्ज मागे
चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी ग्रामपंचायत निवडणुकीतील 66 पैकी 65 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. भिसी ग्रामपंचायत निवडणुकीतील सर्व 66 उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उमेदवार व गटनेत्यांच्या काल झालेल्या बैठकीत झाला होता निर्णय. जवळपास १५ हजार मतदार असलेल्या भिसी गावाला सध्या अप्पर तालुक्याचा दर्जा मिळालेला आहे आणि राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २९ डिसेंबरला एक परिपत्रक काढून भिसीला नगर पंचायत करण्यात येत असल्याचा आदेश काढला होता. या परिपत्रकाप्रमाणेच निवडणूक घेण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.
सोलापुरात 11 ग्रामपंचायत बिनविरोध
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आज शिरापूर, पीर टाकळी, जामगाव, वाघोली आणि वडवळ या पाच ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या 11 वर गेली आहे.
बारामती तालुक्यातील सर्वच 77 उमेदवारांची माघार!
बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीच्या सर्व इच्छुकांची माघार घेतली आहे. माळेगाव ग्रामपंचायतीच्या सर्वच्या सर्व 77 इच्छुकांनी उमेदवारी माघारी घेतली. माळेगावचे नगरपंचायतीत रुपांतर होणार असल्यानं उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. माळेगावमधील सर्व गटांच्या संमतीने निवडणुक न लढवण्याचा निर्णय झाला होता.
शेवटच्या क्षणी बिनविरोध
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात अगदी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी नऊ सदस्य असलेली ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली. त्यामुळे ग्रामस्थांनी गुलाल उधळून, फटाके फोडत जल्लोष केला. तर वाशिम तालुक्यातीलच कोंडाळा, तोडगाव, भोयता, किनखेडा या चार ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून सावरगाव ग्रामपंचायतीचे निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचं स्वप्न भंगले आहे.