‘ग्रामपंचायती’च्या निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यास बंदी, कारण…

0
217

पुणे , दि. १८ (पीसीबी) : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी 79 टक्के मतदान झालं. उद्या (18 जानेवारी 2020) सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाला अवघे काही तास उरले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नुकतंच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर ठिकठिकाणी जल्लोषात विजयी मिरवणुका काढल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. नुकतंच पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार सोमवारी पहाटे 12 पासून ते रात्री 12 पर्यंत दिवसभर मिरवणुका काढणे, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे या सर्व गोष्टींना बंदी असेल, असे यात नमूद करण्यात आले आहे. तसेच सोमवारी रात्री 10 पासून ते मंगळवारी 6 पर्यंत हॉटेल, ढाबे, खानावळी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही यात म्हटले आहे.