गौरी लंकेश हत्येप्रकरणातील अमोल काळे, अमित बद्दी, गणेश मिस्त्रे यांना एटीएसची कोठडी

0
567

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकच्या विशेष तपास पथकाकडून अटक करण्यात आलेले आरोपी अमोल काळे, अमित बद्दी आणि गणेश मिस्त्रे यांना आज (शनिवारी) महाराष्ट्र एटीएसने मुंबईच्या सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने या तिघांना १२ ऑक्टोबरपर्यंत एटीएसची कोठडी सुनावली. नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसला त्यांची चौकशी करायची आहे.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी अमोल काळेच्या डायरीतून धक्कादायक माहिती समोर आली होती. अमोल काळेच्या डायरीत काही नाव लिहून ठेवण्यात आली होती. ही नाव त्यांचे पुढील टार्गेट होती. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयकडून मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, अमोल काळेच्या डायरीत एकूण सहा नावं होती. यामधील चार जण ठाण्यातील तर एक जण उत्तर प्रदेशातील आहे तर सहावे नाव मुंबई एसपी असे लिहिण्यात आले होते.

मुंबई एसपी हे नाव एसपी नंदकुमार नायर यांचे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कारण नंदकुमार नायर यांनीच नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पहिली अटक केली होती. त्यांनी विरेंद्र तावडेला अटक केल्यापासून टार्गेटवर असल्याची माहिती आहे. अमोल काळे आणि विरेंद्र तावडे यांनीच मिळून दाभोलकरांच्या हत्येचा कट आखल्याचे बोलले जात आहे.

गौरी लंकेश हत्येतील प्रमुख आरोपी अमोल काळे हा डॉ. दाभोलकर यांच्या हत्याकटात सामील असल्याची माहिती तपासातून उघड झाली होती. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेले पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती सीबीआयच्यावतीने न्यायालयात देण्यात आली होती. सीबीआयने अमोल काळेला ताब्यात घेतले होते.