गोव्यात विधानसभा विसर्जित करण्याच्या हालचालींना वेग

0
926

पणजी, दि. ११ (पीसीबी) – गोव्यातील राजकीय कोंडी सोडवण्यासाठी विधानसभा विसर्जित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  शुक्रवारी (दि.१२)  घटक पक्षांचे नेते व सहकारी मंत्र्यांशी  चर्चा करणार असल्याचे समजते.  काँग्रेसने बुधवारी पणजीत मोठा मोर्चा काढून जाहीर सभा घेतल्यानंतर या हालचाली सुरू झाल्या आहेत.  

दरम्यान, विधानसभा विसर्जनाच्या राजकीय पर्यायाची चाचपणी सुरु झाली असून केंद्रीय गृह मंत्रालयाने विधानसभा विसर्जनानंतर राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांना सल्लागार म्हणून काम करण्यासाठी १९८६ पूर्वीच्या बॅचच्या आयएएस अधिकाऱ्यांचा शोध  सुरु केला आहे. त्याचबरोबर   वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचाही शोध सुरु केला आहे.

राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा १९८६ च्या बॅचचे अधिकारी आहेत. विधानसभा विसर्जन केल्यानंतर राज्यपालांसाठी दोन अधिकाऱ्यांचे सल्लागार मंडळ नेमले जाणार आहे ‌. याबाबत अंतिम निर्णय व्हायचा आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री आपल्याकडील खाती सहकारी मंत्र्यांना देणार आहेत. त्यासाठी  मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी (दि.१२) सकाळी ११ वाजता हे नेते, मंत्री भेटणार आहेत.