गोव्यात मुख्यमंत्री बदलण्याची गरज नाही –  खासदार विनय तेंडुलकर

0
910

पणजी, दि. १६ (पीसीबी) –  राज्यातील भाजपचे सरकार कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्रीपद मनोहर पर्रिकर यांच्याकडे कायम राहिल, असे गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी आज (रविवार) येथे सांगितले. भाजपचे ३ निरीक्षक संघटनात्मक कामासाठी गोव्यात आले आहेत. असे सांगून पर्रिकर थोड्या दिवसांत पुन्हा कामाला लागतील, असेही तेंडुलकर म्हणाले.

मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या आजारामुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री बदलण्याची सध्या गरज नाही. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे, असे तेंडुलकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना शनिवारी सकाळी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यानंतर गोव्यात नेतृत्वबदलासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय निरीक्षक आज सकाळपासून गोव्यात दाखल झाले आहेत. निरीक्षक बी. एल. संतोष सकाळी दाखल झाले तर विजय पुराणिक आणि रामलाल दुपारी पोहोचले. हे सर्व पणजीतील फिदाल्गो हॉटेलमध्ये थांबले आहेत.