गोव्यात नेतृत्वबदलाच्या घडामोडींना वेग; काँग्रेसचे दोन आमदार भाजपच्या गळाला

479

पणजी, दि. १६ (पीसीबी) – मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावल्याने गोव्यात आता नेतृत्वबदलाच्या घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने सोमवारी  विधीमंडळ गटाच्या बैठकीच्या नावाखाली काँग्रेस आमदारांना एका ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसचे किमान दोन आमदार भाजपच्या  गळाला लावण्यात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे  यांना यश आल्याचे समजते. 

भाजप श्रेष्ठींसमोर काँग्रेसच्या आमदारांना चर्चेला नेण्यासाठी रात्री ९.३० च्या विमानाने राणे दिल्लीला रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यानंतर काँग्रेसचे मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे आणि शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर हे आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह मध्यरात्रीच्या विमानाने दिल्लीला रवाना झाले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांचा आजार गंभीर आहे. त्यामुळे भाजप आणि सत्ताधारी आघाडीतूनही पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसचे दोन आमदार काल मध्यरात्री भाजप श्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.