गोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली; १४ आमदारांनी राज्यपालांची घेतली भेट

0
630

पणजी, दि. १७ (पीसीबी) – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे गोव्यात काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसचे १४ आमदार सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आज (सोमवारी) राज्यपाल भवनात गेले आहेत. दरम्यान, राज्यपालांनी मंगळवारी (दि. १८) काँग्रेसच्या आमदारांना भेटीसाठी वेळ दिल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेसच्या १४ आमदारांनी राजभवनात जाऊन राज्यपालांच्या कार्यालयात पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी देण्याची विनंती केली आहे. या पत्रावर १४ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. काँग्रेसला भाजपमधील काही आमदारही पाठिंबा देऊ शकतात, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. मनोहर पर्रिकरांच्या अनुपस्थितीत काँग्रेस सरकार चालवण्यासाठी सक्षम असल्याचे नेत्यांनी सांगितले.

गोवा विधानसभेत ४० जागा असून यात भाजपाचे १४ आमदार आहेत. मगोप व जीएफपीचे प्रत्येकी ३ आमदार आहेत. याशिवाय ३ अपक्ष आमदारांचाही भाजपाला पाठिंबा आहे. तर काँग्रेसकडे १६ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदारांना पाठिंबा दिला आहे.