Desh

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी ज्येष्ठ मंत्र्यांकडे द्या, अन्यथा वेगळा विचार – दीपक ढवळीकर

By PCB Author

October 25, 2018

पणजी, दि. २५ (पीसीबी) – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारातून पूर्णपणे बरे होत नाहीत. तोपर्यंत त्यांचा पदभार सरकारातील ज्येष्ठ मंत्र्यांकडे देण्यात यावा, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा गोमांतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिला आहे. तसेच मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मगो पक्षाचे उमेदवार असतील, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

पार्सेकर, मगोबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक सुभाष वेलिंगकर हे देखील भाजपविरोधात रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे भाजपसाठी मांद्रे आणि शिरोडा  पोटनिवडणुका खडतर असल्याचे बोलले जात आहे.

भाजपकडून पर्यायी नेतृत्व देण्यास टाळाटाळ  केली जात आहे. सरकारचा कारभार  ठप्प झाला आहे. त्यामुळे प्रशासन  पांगळे होत चालले आहे.  राज्यातील  खाण विषय  रखडलेला आहे. सरकारविरोधात जनतेमध्ये  रोष वाढू लागला आहे.  त्यामुळे सरकारचा एक जबाबदार घटक  म्हणून मगो पक्षाने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे.  भाजपला राज्यातील परिस्थितीची जाणीव करुन  दिली जाणार आहे, असे ढवळीकर   म्हणाले.

मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे  राज्य मंत्रिमंडळाची बैठक  बऱ्याच दिवसांपासून झालेले नाही. त्यामुळे ते आजारातून  बरे होईपर्यंत मंत्रिमंडळातील ज्येष्ठ  मंत्र्यांकडे  मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणीही ढवळीकर यांनी केली आहे.