गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेला जाणार

0
1127

पणजी, दि. २९ (पीसीबी) – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आज (बुधवारी) गोव्यात दाखल होतील,  असे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले होते. मात्र, आज  सायंकाळी ते पुढील उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेला रवाना होतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.    

मुख्यमंत्री पर्रिकर २२ ऑगस्टला अमेरिकेहून ११ दिवसांचे उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग’ स्मृती रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरू  होते.  यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर आणि गोमेकॉचे डॉक्टर कोलवाळकर  उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी गोव्यात परतल्यानंतर विश्रांती घेतली नाही. दाबोळी विमानतळावर आल्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश भाजप नेत्यांकडून हाती घेतला व ते  लोकांच्या गर्दीत सहभागी होऊन अर्धा किलोमीटर चालत गेले. त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी निघून गेले.

दुसऱ्या दिवशी त्यांना उलट्यांचा त्रास होऊ  लागल्याने तातडीने मुंबईतील लीलावती रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पर्रिकर शनिवारी किंवा रविवारी गोव्यात परतणार होते. मात्र, नंतर ते बुधवारी गोव्यात पोहोचतील, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने सांगण्यात येत होते. मात्र, पर्रीकर आज सायंकाळी तिसऱ्यांदा अमेरिकेत जाणार आहेत. याबाबत दुपारपर्यंत ते मंत्रिमंडळाला कल्पना देणार आहेत.