गोवारी समाज आदिवासी; अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा – उच्च न्यायालय

0
1193

नागपूर, दि. १४ (पीसीबी) – गोवारी समाज हा आदिवासी आहे.  त्या  समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावा,  असा ऐतिहासिक निकाल आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.  यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गोवारी समाजाच्या लढ्याला यश आले आहे.   

गोवारी समाज अनेक वर्षांपासून आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी  करत आहे. अखेर आज गोवारी समाज आदिवासी असल्याच्या मागणीवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने गोवारी समाजाच्या वतीने आनंद व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, गोवारी समाजाला आदिवासी दर्जा मिळावा, यासाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यामुळे चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये ११४ जणांचा मृत्यू झाला होता.

गोवारी समाजाला आदिवासी घोषित करा जेणेकरुन आम्हाला अनुसूचित समातीमध्ये आरक्षण मिळेल, अशी मागणी समाजाची होती. सध्या गोवारी समाजाला विशेष मागास वर्ग (एसबीसी) अंतर्गत दोन टक्के आरक्षणाची तरतूद आहे.