गोयल, राऊत, पटेल यांना पुन्हा संधी मिळणार ! भाजपकडून मेघा कुलकर्णी यांच्या नावाचा विचार

0
282

अपक्ष म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचा 6 व्या जागेवर दावा

पिंपरी दि. १३ (पीसीबी)- १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५७ जागा भरण्याकरिता १० जूनला निवडणूक घेतली जाणार असून निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे यामधील रिक्त होणाऱ्या जागेसाठी पुन्हा 3 खासदारांना संधी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामध्ये भाजपचे पियुष गोयल, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रावादीचे प्रफुल्ल पटेल यांच्या नावांचा समावेश आहे. उर्वरीत कॉंग्रेसचे पी. चिदंबरम तर भाजपकडून विकास महात्मे, विनय सहस्रबुद्धे यांना पक्ष पुन्हा संधी देणार नसल्याचे सांगितले जाते. भाजपकडून पियुष गोयल व मेघा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. कोथरूडच्या माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा सदस्य करिता उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातून महिला मोर्चाच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या त्या एकमेव पदाधिकारी आहेत.

कॉंग्रेसतर्फे कोणाला उमेदवारी मिळणार हे नाव गुलदस्त्यातच आहे. राज्यातील विधानसभा, विधानपरिषद सदस्यांच्या संख्याबळानुसार प्रथम क्रमांकाची मतांचा कोटा प्रमाणे भाजप 2 आणि महाविकास आघाडी 3 जागांवर बहुमत प्राप्त करू शकते. 6 व्या जागेसाठी बहुमताअभावी भाजप व महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्यास अडचण येणार असल्याचे ओळखून सदरील जागा अपक्ष म्हणून लढविण्याचा मानस माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना केल्याची घोषणा करून महाराष्ट्रात स्वतंत्रपणे राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यादृष्टीनेच त्यांची वाटचाल सुरु आहे. कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसभेची आगामी निवडणूक ही स्वबळावर लढवेन असे देखील स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले कि, यापूर्वीच्या संख्याबळानुसार तीन जागा भाजप, एक जागा राष्ट्रवादी, एक जागा शिवसेना आणि एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून जात होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या संख्याबळात बदल झाला आहे. आता भाजपच्या वाट्याला दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी १ जागा जाईल. त्यामुळे सहावी जागा रिकामी राहणार आहे. या जागेवर निवडून येण्यासाठी ४२ मतांच्या संख्याबळाची गरज आहे. सध्या महाविकासआघाडीकडे २७ आणि भाजपकडे २२ मते आहेत. त्यामुळे मी या सहाव्या जागेवर माझा दावा सांगतो, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे, जे २९ अपक्ष आमदार आणि लहान पक्ष आहेत, तुम्ही मोठं मन दाखवा आणि मला समर्थन द्या, मी तुम्हाला भेटायला येणार आहे, सर्व पक्षीयांनी पाठिंबा देत मला राज्यसभेवर पाठवावे, मी आजपासून कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही, असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा राजकीय प्रवास महाविकास आघाडीच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहे. संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढताना पराभव पत्करावा लागला होता. सहा वर्षांपूर्वी त्यांना राष्ट्रपती कोटय़ातून राज्यसभा सदस्यत्व देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग महत्त्वाचा होता. भाजपचे मराठा संघटन भक्कम करता येईल असा यामागे उद्देश होता. तथापि संभाजीराजे यांनी निवड झाल्यानंतर थेट भाजपची प्रचारकाची उघड भूमिका घेतली नाही. भाजपशी संबंध पहिल्या सारखे नाहीत तरी त्यांना भाजप पाठींबा देईल अशी आशा वाटते. भाजपच्या भूमिकेवर त्यांची राज्यसभा निवडणूक अवलंबून असेल. दरम्यान राज्यातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी 31 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर 10 जून रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. देशभरातील 57 राज्यसभेच्या जागासाठी निवडणूक होणार असल्याची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने केली आहे. त्यात हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. राज्यातील राजसभा सदस्य पियुष गोयल, पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, विकास महात्मे, संजय राऊत, विनय सहस्रबुद्धे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. 15 राज्यांतील 57 सदस्य हे जून ते ऑगस्ट दरम्यान निवृत्त होत असल्याने ही निवडणूक आवश्यक होती. पियुष गोयल, पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, विकास महात्मे, संजय राऊत, विनय सहस्रबुद्धे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत वेगवेगळय़ा तारखांना निवृत्त होणाऱ्या सदस्यांमुळे रिक्त होणार असलेल्या १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५७ जागा भरण्याकरिता १० जूनला निवडणूक घेतली जाईल, असे निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले. निवृत्त होणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, काँग्रेसचे नेते अंबिका सोनी, जयराम रमेश व कपिल सिबल आणि बसपचे सतीशचंद्र मिश्रा यांचा समावेश आहे. सदस्य २१ जून ते १ ऑगस्टदरम्यान निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील ११ जागा रिक्त होणार असून, तमिळनाडू व महाराष्ट्रातील प्रत्येकी सहा, बिहारमधील पाच, तर आंध्र प्रदेश, राजस्थान व कर्नाटकमधील प्रत्येकी ४ सदस्य निवृत्त होणार आहेत. याशिवाय मध्य प्रदेश व ओडिशातील प्रत्येकी तीन, तेलंगण, छत्तीसगड, पंजाब, झारखंड व हरियाणातील प्रत्येकी दोन आणि उत्तराखंडमधील एका सदस्याचा निवृत्त होणार असलेल्यांमध्ये समावेश आहे. या निवडणुकीची अधिसूचना २४ मे रोजी जारी केली जाणार असून, मतदान १० जूनला घेतले जाईल. प्रचलित पद्धतीनुसार, मतदान संपल्यानंतर एका तासाने मतमोजणी सुरू केली जाईल. निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना निवडणूक आयोजित करताना कोरोना नियमांचे पालन केले जाईल याची खात्री करण्यासाठी राज्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत