Pune

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी – खासदार डॉ. अमोल कोल्हे

By PCB Author

April 29, 2020

पुणे,दि.२९(पीसीबी) – लॉकडाऊन काळात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रस्ताव कृषी विभागाकडून सादर होऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रस्ताव सादर करण्यासाठी विमा योजनेला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे.

राज्य शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत असंख्य शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून कृषी विभागाकडे सादर केलेले शेतकऱ्यांचे प्रस्ताव अद्याप कृषी विभागाकडेच पडून आहेत. हे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवले न गेल्यास शेतकऱ्यांना अपघात विमा संरक्षणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

या संदर्भात शेतकऱ्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांच्याशी संपर्क साधून विमा योजनेला मुदतवाढ देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. शेतकऱ्यांच्या मागणीची तत्काळ दखल घेत डॉ. कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांना पत्र पाठवून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेला ३ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.