गोध्रा जळीतकांड; दोन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

0
893

अहमदाबाद, दि. २७ (पीसीबी) – गुजरातमध्ये २००२ मध्ये घडलेल्या गोध्रा जळीतकांड प्रकरणातील इम्रान उर्फ शेरू भटुक आणि फारूख भाना या दोन आरोपींना एसआयटी न्यायालयाने आज (सोमवार) दोषी ठरवले. त्या दोघांना  आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर हुसेन सुलेमान मोहन, फारूख धंतिया आणि कासम भमेडी या अन्य तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

गोध्रा जळीतकांड प्रकरणी वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी ६ आरोपींना अटक केली होती. यापैकी कादीर पटालियाचा यावर्षी जानेवारी महिन्यात मृत्यू झाला. इतर पाच जणांवर खटला चालला आणि याप्रकरणी विशेष न्यायाधीश एच. सी. व्होरा यांच्या न्यायालयाने निकाल दिला.

हुसेन मोहनला २०१५मध्ये मध्य प्रदेशातील झाबुआ येथून अटक करण्यात आली होती. भटुकला महाराष्ट्रातील मालेगाव येथून जुलै २०१५ मध्ये अटक झाली होती. भमेडीला दाहोद रेल्वे स्टेशनवरून तर धंतिया आणि भानाला गोध्रातील त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते.