गेमचेंजर…राफेल विमाने २७ जुलै पर्यंत भारतात

0
546

दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – कुठल्याही युद्धामध्ये गेमचेंजर ठरु शकणारी राफेल फायटर विमानांची पहिली तुकडी येत्या २७ जुलै रोजी भारतात दाखल होत आहे. हरणाच्या अंबाला एअर बेसवर राफेलची पहिली तुकडी तैनात होईल. प्राथमिक माहितीनुसार, फ्रान्सच्या इस्ट्रेसवरुन चार ते सहा राफेल विमाने भारतात दाखल होतील. राफेलची गोल्डन अ‍ॅरो स्क्वाड्रन ऑगस्टमध्ये कुठल्याही लढाईसाठी सज्ज असेल.

सध्या चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्वाची घडामोड आहे. राफेलचा इंडियन एअर फोर्समध्ये समावेश होणे, चीनसाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण चीन-पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे कुठलेही फायटर विमान नाहीय. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

दक्षिण फ्रान्सच्या इस्ट्रेस बेसवरुन भारतीय वैमानिकच हरयाणाच्या अंबाला बेसवर राफेल फायटर विमाने घेऊन येतील. फ्रान्स ते भारत प्रवासात फक्त यूएईमधील अल धाफ्रा एअर बेसवर ही विमाने काही वेळासाठी थांबतील.

भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या करारानुसार, २०२२ पर्यंत फ्रान्स भारताला एकूण ३६ राफेल फायटर विमाने देणार आहे. या वर्षात चार ते सहा राफेल विमाने भारताला मिळतील. राफेलची पहिली तुकडी अंबाला बेसवर तर पश्चिम बंगालच्या हासिमारा बेसवर दुसरी स्क्वाड्रन असेल. राफेल हे चौथ्या पिढीचे अत्याधुनिक फायटर विमान आहे