Pimpri

गॅस चोरी प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई

By PCB Author

May 12, 2022

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) -घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून लहान सिलेंडरमध्ये गॅस काढून त्याची चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली. त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे.

कै. बाजीराव तुकाराम पाडाळे चौकाजवळ म्हाळुंगे येथे मंगळवारी (दि. 10) पहिली कारवाई करण्यात आली. यात प्रकाश उर्फ चंदन सरबेज प्रजापती (वय 20, रा. हुलावळे वस्ती, हिंजवडी) याला अटक केली आहे. सहाय्यक निरीक्षक सागर काटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

आरोपीने एका पत्र्याच्या खोलीत घरगुती वापराचा गॅस मोठ्या गॅस टाकीतून लहान टाक्यात चोरून काढला. त्या गॅस टाक्या आरोपीने चढ्या दराने विकल्या. गॅस अवैधरित्या विकणे, गॅस टाक्यांची विनापरवाना साठवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश याच्या ताब्यातून गॅस भरलेली टाकी, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, रिलीफ पिन असा सात हजार 680 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

देविदास चिंधू बुचडे यांच्या शेतात मारुंजी येथे दुसरी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिरू हरिबा दुधाळ (वय 28, रा. मारुंजी), देविदास चिंधू बुचडे, गॅसच्या टाक्या पुरवणारा कस्पटे गॅस एजन्सी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी बिरू याने 15.6 किलो वजनाच्या टाक्यातून 19.5 किलो वजनाच्या टाक्यांमध्ये गॅस चोरून काढला. चोरून भरलेल्या गॅस टाक्या आरोपीने विनापरवाना लोकांना विकल्या. आरोपी देविदास आणि कस्पटे गॅस एजन्सीने त्याला गॅस टाक्या पुरवल्या. आरोपीकडून दोन टेम्पो, एक लाख 150 रुपये किमतीचे इतर साहित्य असा एकूण तीन लाख 150 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.