गृह विभाग झेपावत नसल्याने त्यांनी राजीनामा देऊन पर्यटन खाते मागून घ्यावे – राजेंद्र पातोडे

0
335

 

औरंगाबाद, दि.१० (पीसीबी) – राज्याचे गृहमंत्री शोभेचे पद बनले असून देश लॉकडाऊन असताना पोलीसांवर हल्ले होत आहेत दुसरीकडे कॅबिनेट मंत्री नागरिकांना उचलून मारहाणीत सहभागी असल्याचे आरोप होत असून संचारबंदीत सामान्य नागरिकांना रस्त्यावर चोपले जात आहे तर घोटाळ्यातील आरोपींना महाबळेश्वरात जाण्याची परवानगी बहाल केली जाते.यामुळे गृहमंत्री यांचा स्वत:च्या खात्यावर प्रभाव नसल्याचे स्पष्ट असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.

पातोडे म्हणाले की, रस्त्यावर याल तर पोलीसांनी काठ्यांना तेल लावल्याचे सामान्य नागरिकांना वृत्त वाहिनीवर धमकाविणारे गृहमंत्री राज्याला लाभले आहे.मात्र त्याचवेळी डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यातील जामीनावर असलेले आरोपी वाधवान बंधूंना व कुटुंबाला देशात संचारबंदी लागू असताना महाबळेश्वरला प्रवास करण्यासाठी विशेष पास किंवा परवानगी दिली जाते. महाबळेश्वरला जाताना त्यांच्या गाड्यांचा ताफा कुठेच अडवला गेला नाही. कारण गृह खात्याचे वि़शेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता हे वाधवान कुटुंबाचे मित्र म्हणून पत्र देतात.पोलीस प्रशासन सेवेतील अधिकारी असलेल्या अमिताभ गुप्ता ह्यांना तातडीने बर्खास्त करून त्यांना घोटाळ्यातील आरोपींना सहकार्य केले म्हणून सहआरोपी केले पाहीजे होते.परंतु त्यांना चौकशी होईपर्यंत केवळ सक्तीचे रजेवर पाठविले गेले आहे. त्याचबरोबर राज्य मंडळातील मंत्री अभियंत्याचे अपहरण करून मारझोड करायला लावतो अशी तक्रार दाखल होते. त्यात मंत्र्याच्या अंगरक्षक व पोलीस अधिकारी यांची नावे येतात. तरीही गृहमंत्री शांतच असतात.सदाशिव भिडे जाहिरपणे गौमूत्र व तुपाने कोरोना बरा होतो हे सांगतात. त्यांचेवर अफवा पसरवली म्हणून गुन्हा दाखल केला जात नाही.ऊलट ही मागणी करायला गेलेल्या लोकांना संचारबंदी मोडली म्हणून आरोपी करण्यात आले.तबलीगीच्या कार्यक्रमास परवानगी दिली म्हणून केंद्रीय गृहमंत्री व अजित डोवाल यांचेवर खळबळजनक आरोप करणारे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. राज्याचे गृहमंत्री यांचे नाव व स्वाक्षरी त्यावर आहे. मीडियामध्ये बातम्या आल्या परंतु गृहमंत्री ते पत्र ऑफिशियल आहे वा नाही याचा खुलासा करीत नाही.पत्रातील आरोप गंभीर असताना ते मुग गिळून गप्प बसले आहेत.कालच औरंगाबाद मध्ये पोलीसांवर हल्ला झाला, त्याआधी नागपुरात पेरोल वर सुटलेल्या आरोपीने पोलीस कर्मचारी यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीची हत्या केली.मराठवाड्यात दलित कुटुंबावर कोरोना पिडीत म्हणून हल्ला करण्यात आला.दलिअत्याचाराची बरीच प्रकरणे लॉकडाऊन पुर्वी घडली त्यावेळी गृहमंत्री यांना तेल लावलेल्या काठ्या का दाखवता आल्या नाही, असा सवालही वंचितने विचारला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृह विभाग झेपावत नसल्याने त्यांनी राजीनामा देऊन पर्यटन खाते मागून घ्यावे, असा खोचक सल्ला देखील राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.